Saturday, November 29, 2008

मेडिआ आणि अतिरेक

मेडिआचा वापर हा अतिरेकी फोर्स मुल्टिप्लायर म्हणून करत आहेत आणि ते थांबायला हवे. जसे अतिरेक्यांशी कुठल्याही वाटाघाटी करणार नाही हि भूमिका योग्य आहे तशाच प्रकारची भूमिका मेडिआने घ्यावी. अतिरेक्यांना त्यांच्या कारवायांना ठळक प्रसिद्धी दिली जाणार नाही असे एकतर मेडिआने स्वतःवर बंधन घालावे अथवा तसा कायदा सरकारने करावा असे मला वाटते. तसेच जेव्हा अतिरेक्यांवर कारवाई होत असेल तेव्हा मेडिआने लाइव कव्हरेज द्यायचे टाळावे तसे मेडिआ करणार नसेल तर जी मेडिआ चॅनेल असे करेल त्यांचे लायसन्स जप्त करावे अथवा प्रचंड दंड आकारावा...

माहिती हे शस्त्र आहे आणि त्याचा वापर अतिरेकी त्यांच्या विरोधात होणाऱ्या कार्यवाहिला निष्प्रभ करण्यासाठी वापरू शकतात किंबहुना करतात. हे मेडिआला समजत नाही असे नाही. पण फालतू चढाओढीत राश्ट्रहिताचे समाज हिताचे काय हे मेडियाला समजत नसेल तर मेडिआला लगाम हे लोकशाहीतील नागरीक म्हणून आपले कर्तव्य आहे.

त्याच प्रमाणे कोणत्याही चालू केस वर, पोलिस चौकशी संदर्भात मेडियाने बातम्या देऊ नयेत असाही नियम काढावा ह्या मताचा मी आहे. एखाद्या महत्त्वाच्या केसचे राजकियकरण टाळणे एक लोकशाही म्हणून महत्त्वाचे आहे. योग्य न्याय मिळाला नही असे वाटल्यास मेडियाने तशी मोहीम उघडणे योग्य पण न्याय मिळायच्या आधीच ती केस मेडिआने चालवून जनतेच्या मनात आधीच एखाद्याला (एखाद्या समजाला) गुन्हेगार ठरवणे हे पूर्णतः चुकीचे, न्यायाच्या विरुद्ध व लोकशाहीला घातक आहे.

अतिरेकी मेडिआ हा समाजाचा चौथा खांब होऊ शकत नाही. इतर खांबावर समाजाचा अंकुश निवडणुकीद्वारे आहे मेडिआवर समाजाचा अंकुश नाही. त्याचा गैरफायदा मेडिआ घेत आहे असे मला वाटते. तो अंकुश असायला हवा. मेडिआ राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं होणं समाजाला परवडणारे नाही म्हणून एकतर मेडिआने स्वतःची अशी आचार संहिता तयार करावी अथवा अशी संहिता इन्डीपेंड्न्टपणे तयार करून ती लोकानी मतदानाद्वारे मेडिआवर बांधकारक करावी.

Friday, February 22, 2008

मराठी असणे म्हणजे काय ?

मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असे वाद वर्तमान पत्राचे रकाने भरू लागला. राजठाकरेने मराठी बाणा, मराठी माणूस ह्यांचे हाकारे घालायला सुरवात केली आणी न्यूनगंडाने पछाडलेले मराठी मन रस्त्यावर आले. जे रस्त्यावर आले नाहीत ते तावातावाने घरीच चार चार कप चहा रिचवत चर्चा करू लागले. मराठी माणूस मागे पडला आहे आणि त्याच्यावर सतत अन्याय होतो आहे. ह्या भावनेला मराठी मनात कधी जागा मिळाली हे देखील कुणाला ज्ञात नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला हाच मराठी माणूस राष्ट्र पुनर्रचनेत, समाज परिवर्तनात अग्रभागी होता. राजकीय विचाराच्या कडक उजवी पासून कडक डावी पर्यंत मराठी माणूस नुसता सक्रिय नव्हता, खऱ्या अर्थाने नेता होता. त्याच्या कडे नवा विचार द्यायची कुवत होती. मग काय झाले? मराठी मनाचे हे आजचे पानिपत झाले तरी कोठे?

ह्या पिचलेल्या मराठी मनाचे नेते हे राज ठाकरे वा बाळ ठाकरे सारखे असावेत ह्यात नवल ते कुठले? भयगंडित मनाला (खोटी का होईन) सुरक्षीततेची गरज असते. नव्या दृष्टी, नव्या वाटा पेलायला हे मन असमर्थ असते. ह्यातली काही मने मग रुढी, परंपरांना जास्त कवटाळून असतात किंबहुना गत काळाला सोन्याचे वर्ख लावून आत्मप्रौढी करण्यात रममाण असतात. हे नवा शिवाजी घडवू शकत नाहीत पण जो होऊन गेला त्याच्या भूतकालीन विजयात स्वतः:चे विजय शोधतात. त्या भूतकालीन राजाचे मानापमान, शत्रू, मित्र स्वतः:चे समजून प्रसंगी समाजास वेठणीस धरतात. प्रत्येक माणूस हा न्यूनगंडातूनच भाषा बदलतो असेही सर्वदूर वक्तव्य मला करायचे नाही. पण काही मने मराठी ही ऒळख विसरण्याचा, लपवण्याचा, तिच्यापासून दूर पळण्याचा, किंवा पूर्णतः:नवी ओळख घेण्याचा प्रयत्न करतात. मराठी शाळांतून कमी होणारी विद्यार्थी संख्या आणी इंग्रजी माध्यमासाठी वाढणारी गर्दी हे जसे शिक्षणाच्या खेळखंडोबाच प्रतीक आहे तसेच ह्या दुसऱ्या प्रकारच्या मनांचे खूपश्या प्रमाणात द्योतक आहे. भाषा ही विचारांचे वाहक आहे. उत्तम विचार कुठल्याही भाषेतून व्यक्त झाला तरी भिडल्या शिवाय रहात नाही. असे असताना कुठल्याही एकाच भाषेचा आग्रह का धरावा हा रास्त प्रश्न आहे. कोणत्याही एकाच भाषेचा आग्रह धरणे मला तरी चुकीचे वाटते. जसा आग्रह धरणे चुकीचे आहे तसाच इंग्रजीचा आग्रह धरणे चुकीचे आहे. कामाच्याठिकाणी एखादी समान भाषा वापरणे आणि समाजात एकाच भाषेचा आग्रह धरणे ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत असे माझे मत आहे. प्रत्येकाला त्याला आवडेल ती भाषा बोलण्याचे / शिकण्याचे / शिकवण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे.

माणसाला विचारस्वातंत्र्य आहे आणि त्याला आवडेल तो धर्म, भाषा निवडण्याचा त्याला अधिकार आहे. मराठी माणसाला मराठी भाषा न्यूनगंड वाटावा इतकी आजच्या जगासाठी अपुरी वाटू लागली आहे की काय? असे वाटायला लागले आहे. ह्या अर्थी काही वर्षांनी मराठी समाजाची अधिकृत भाषा कदाचित इंग्रजी बनू असेल. ह्यात मला काहीच वावगे दिसत नाही. पण इंग्रजी येणारा बाळ्या आणी मराठी बोलणारा कार्टा असले मनोविकृत विचार थांबायला हवेत. मराठी समाजाची व्याख्या किंवा मराठी असणे म्हणजे काय असणे असे www.maayboli.com ह्या मराठी संकेतस्थळावर विचारले होते. त्यात मराठी समाजाची / मराठी असण्याची व्याख्या किती धूसर व वैयक्तिक आहे हे दिसून आले. भौगोलिक, सांस्कृतिक, भाषिक ह्या बरोबरच अनेकांनी म्हटले की भावनिक संबंध जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही मराठी आहात असे आतून वाटायला हवे. मला वाटते भविष्यातील कुठल्याही समाजाची व्याख्या ही अशीच ठरणार आहे. केवळ तुम्ही जन्माने कुठले आहात हा संदर्भ ह्या जागतीकरणात गौण ठरून तुम्ही भावनिक रित्या कशाला आपले मानता ह्यावरच तुमचे भाषिक, सांस्कृतिक व इतर वर्गीकरण असणार आहे.

आम्ही सगळे मित्र मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकलो. आमच्या सारख्या इतरांसारखाच आम्हालाही मराठी ते इंग्रजी हा प्रवास खडतर गेला. आम्ही आमच्या परीने त्यावर उत्तरे शोधली. पण ह्या प्रवासात आम्हा मित्रातही दोन तट आहेत. एक अजूनही मराठीवर प्रेम करणाऱ्यांचा त्या भाषेला भविष्य आहे असे मानणाऱ्यांचा व दुसरा तसे नाही असा समजणारा. मराठीचे भविष्य काय असू शकते? हे मात्र मला सांगता येणार नाही. पण ७०० वर्षा पूर्वी सुधा तिला काय भविष्य आहे असे विचारले असता एका प्रतिभावंताने ’अमृतातही पैजा जिंके" अशी अक्षरे मिळवण्याचा अट्टहास धरला होता ते आठवते. कदाचित तितकी प्रतिभा आमच्यात नाही पण तोच प्रवाहा विरुद्ध पोहण्याचा जिगर असायला काय हरकत आहे?

पण पुढच्या पिढीचे काय? मराठी विषयीचा कुठलाही वाद संवाद मुलांचे शिक्षण कोणत्या भाषेतून व्हावे ह्यावर येतोच येतो. शिक्षणात मराठीचा आग्रह म्हणजे इंग्रजीविषयी तिरस्कार असा सोयीस्कर लावला जातो. मराठीवर माझे नितांत प्रेम आहे, पण ती काय अत्ता काय देऊ शकते काय देऊ शकत नाही हे पण समजायला हवे. हा सारासार विचार करूनच शिक्षण पद्धतीचा अवलंब हवा. आपल्या ठिकाणी ’हि किंवा ’ति’ असेच पर्याय का आहेत? हे मात्र मला कधीही समजले नाही. दोनही भाषा शिकवा, उत्तम शिकवा. दोन्हींची सौंदर्यस्थळे समजावून सांगा. दोन्हींमध्ये मुलांना उत्तम गती असूद्या. मुलांना अनेक पर्याय उपलब्ध असणारे शिक्षण असावे.उद्या मराठी प्रेमी घरात जर्मन भाषेवर प्रेम बसलेला मुलगा वाढू शकतो असे शिक्षणाचे स्वरूप असायला काय हरकत आहे? पुढच्या पिढीला मारून मुटुकुन मराठी शिकवावी असे मला अजिबात वाटत नाही पण मारून मुटकून इंग्रजी शिकवावे असेही नाही. त्याच प्रमाणे केवळ एखाद्या भाषेवर पालकांचे अपार प्रेम आहे म्हणून आजच्या जागतिक भाषेपासून मुलांना दूर ठेवावे हे देखिल बरोबर नाही. मुलांना त्यांचा पर्याय निवडता येईल इतके समृद्ध बनवणे हा शिक्षणाचा उद्देश असायला काय हरकत आहे?

’मी मराठी आहे, असे वाटत असेल तर मराठीचा विकास तिचे भविष्य हे देखिल ह्या मराठी म्हणवणाऱ्यांची जबाबदारी आहे. त्या करता कष्ट घेतले पाहिजेत. दांडगाई करून भाषा वाढत नाही, मान मिळत नाही. पायाभूत काम, जगाच्या एके कदम पुढे विचार, व नवनिर्माणाची कुवत हे सगळॆ लागते. इतरांचे मला माहीत नाही. पण जितके मला शक्य आहे तितके करण्याचा अट्टहास प्रसंगी मराठी समाजाच्या विरुद्ध जाऊन केलेली नवनिर्मिती हे अपेक्षित आहे. राज ठाकरे, बाळ ठाकरे, किंवा संभाजी ब्रिगेड हे मराठीचे भविष्य नाही.... किंबहुना नसायला हवे!