Saturday, January 29, 2011

कविता एक चिंतन

इतर साहित्य प्रकारातून व्यक्त व्हायला जस्त कष्ट पडतात. त्या तुलनेत कवितेतून व्यक्त होणे सोपे असा गैरसमज आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा कवितेची पायरी पहिल्यांदा चढली जाते. त्यामुळे इतर साहित्याच्या तुलनेत कविता भारंभार दिसतात असे वाटते. ह्या यमकी, सोप्या कवितेतून सुरू होणारा प्रवास कुठे घेऊन जाईल हे जो हा साहित्यप्रकार हाताळतो त्याच्या वकुबावर अवलंबून असते.

प्रेमावर, प्रेयसीवर तुझ्या तिच्या बद्दलच्या कविता जास्त वाचायला मिळतात कारण ज्या वयात (टीन एजेस) साधारणता व्यक्त होणे ही गरज असते. स्वतःची ओळख व्यायला लागलेली असते त्या वयात हे विषय जास्त जवळचे असतात. अशा वयातील कविता ह्याच विषयाभोवती घुटमळतात. ह्याच विषयावरील कविता वयाची पाने उलटल्यावर जास्त प्रगल्भ झालेल्या दिसतात हा एक भाग. दुसरे हे विषय हाताळण्यास एका पातळीवर सोपे असते त्यामुळे जेव्हा कविता "करण्याची' सुरवात होते तेव्हा असे सोपे विषय आणि कवितेचा सोपा लयबंध (यमक, बोलगाणी, चारोळ्या) वापरले जाणे साहजिक आहे असे वाटते.

माझ्या मते कविता ही प्रामुख्याने खालील दोन घटकांची बनलेली असते

१) भावबंध म्हणजे व्यक्त होणाऱ्या भावना पूर्णं कवितेत कशा चितारल्या/आकारल्या/साकारल्या/बांधल्या गेल्या आहेत हे. ह्यात योजलेल्या व वगळलेल्या उपमा, प्रतिमा, प्रतीके, निदर्शने ह्यांचा समावेश होतो.

२) लयबंध म्हणजे कोणत्या छंदाचा/ वृत्ताचा इ. वापर केला आहे.

हे दोन्ही मिळून कवितेचा आकृतिबंध तयार होतो. हा आकृतिबंध किती सशक्त झाला आहे हे निरपेक्षपणे ठरवणे सोपे नाही खरेतर शक्यच नाही (पण म्हणून प्रयत्न करू नये असेही नाही). अगदीच बेकार उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल कोणाला एक बिअरही चढते तर कोणाला एक ब्लॅक लेबलही कमी पडते स्मित. आकृतिबंधाचा कविता रसिकावर होणारा परिणाम हा त्या वाचकाच्या कुवतीवर अवलंबून असतो. त्यामुळे "जरा जादा तिखा" अशी ऑर्डर सरसकट देण्यापेक्षा आपल्या चवीचा कवी शोधावा स्मित

सगळ्याप्रकारच्या लोकांना आवडेल ती कविता उत्तम असा सुर क्वचित ऐकायला मिळतो. पण मला मात्र तसे वाटत नाही. फारतर सामायिक जाणीवांच्या संदर्भातील ते (काव्य) प्रभावी व उत्तम असू शकते पण सर्व जाणीव विश्वातील उत्तम असू शकत नाही (तसे ठरवता येतही नाही). त्यामुळे अमुक इतक्या लोकांना कविता आवडली म्हणून ही कविता चांगली आणि कोणाला आवडली नाही म्हणून कविता वाईट इतके सोपे कवितेचे मूल्यमापन ठरत नाही असे वाटते.

कविता कुठल्या कारणासाठी लिहिली गेली आहे. ह्याला महत्त्व आहेच. स्वांतसुखाय लिहिलेलं काव्य वेगळं, भावनांशी प्रामाणिक पणे लिहिलेलं काव्य वेगळं, मैफिलीच काव्य वेगळं. कवितेच्या उद्देशावर तीच यश अपयश ठरवण्याचे मापक बदलतात. तिचे रसिका पर्यंत पोचणे महत्त्वाचे अथवा नाही हे ठरते. सरसकट सगळ्या काव्याला एकाच तराजूत तोलणे म्हणूनच शक्य नाही व योग्य नाही असे वाटते.

स्वांतसुखाय कवी मग कविता प्रकाशीत तरी का करतो? असा प्रश्न उपस्थित पडणे साहजिक आहे. मला वाटते ह्याला उत्तर देणे अवघड आहे. तरी ह्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो. कविता हा आकृतिबंध मनाच्या एका उन्मनी अवस्थेत निर्माण होतो आणि अशा आकृतिबंधात कोणत्याही मनास एका जाणीवेपासून दुसऱ्या जाणीवेपर्यंत घेऊन जाण्याची ताकद असते. कविता प्रकाशीत करण्यामागे हा एकमेव उद्देश असतो. तयार झालेला आकृतिबंध वापरून कविता वाचणाऱ्याला त्याच्या एका जाणिवे पासून एखाद्या वेगळ्या जाणीवेपर्यंत जाता आले अथवा त्याच जाणीवेचा वेगळ्या पैलूचे दर्शन झाले अथवा तीच जाणीव नव्याने अनुभवास आली तर ते मी त्या आकृतिबंधाचे यश समजतो. अर्थात ज्या मनोवस्थेतून तो आकृतिबंध तयार झाला त्याच मनोवस्थेत वाचक पोचला पाहिजे हा अट्टहास वा अपेक्षा चुकीची आहे. पण त्या कवीच्या मनोवस्थेची ऊर्जा त्या आकृतीबंधतात उतरली असेल तर असा जाणीवांचा प्रवास वाचकाला जरूर अनुभवायला मिळतोच असा माझा अनुभव आहे. एक वाचक म्हणून अशा जाणीवांचा प्रवास घडवणाऱ्या आकृतिबंधाचा शोध ही आपोआप एक गरज होऊन जाते असे वाटते. ह्या संदर्भाने रूढार्थाने काव्य कळणे वा नकळणे ह्याला काहीच अर्थ उरत नाही असे वाटते.

छंदोबद्ध (मुक्तछंद सोडून) काव्य हेच काव्य असे वरच्या चर्चेत वाचनात आले. हा विचार संकुचित वाटतो. प्रत्येक काव्यप्रकाराची शक्तीस्थाने आणी दुबळे-दुवे आहेत. एकंदरीतच योग्य काव्य-प्रकाराचा उपयोग सशक्त आकृतिबंध निर्माण होण्यात महत्त्वाचा असतो. जाता जाता, खरा कवी असे वर्णवर्चस्वी विचार जोपासत नाही स्मित (दिवे)

अजून एक पडणारा प्रश्न म्हणजे सुप्त मनातून आलेली कविता आणि जागृत मनाने लिहिलेली कविता ह्यात काही फरक आहे का?
माझ्या अल्पमतीनुसार कविता हा कवीचा त्यावेळच्या मानसिक अवस्थेतीतल परफॉर्मन्स असतो. जागृतपणे (इंटेंशनली) व सुप्तपणे (अन-इंटेंशली) आयुष्याच्या, एखाद्या विषयाच्या चिंतनाचा, सभोवार घडणाऱ्या घटनांचा, पाहिलेल्या प्रतिमांचा वापर होत हा परफॉर्मन्स घडतो. ह्यावेळेस निर्माण होणाऱ्या आकृतिबंधावर कधी कवी जागृतपणे नियंत्रण ठेवू शकतो कधी नाही. जागृत व सुप्त अशा दोन्ही अवस्थांच्या संयोगाच्या ह्या वेळेस त्याचा (कवीचा) जागृत पणे केलेला रियाज /अभ्यास जितका महत्त्वाचा तितकाच त्यालाही अवगत नसलेला व नियंत्रण नसलेल्या सुप्त मनाचा लवचीकपणा महत्त्वाचा असतो. सुप्त मनाच्या ह्या लवचीकतेला प्रतिभा असेही म्हणता येईल. त्यामुळे कविता लिहून झाल्यावर जेव्हा कवी पुन्हा केवळ जागृत ह्या अवस्थेतून कवितेकडे बघतो तेव्हा त्या कवितेतील प्रत्येक संदर्भ तो कुठून आला व का आला हे सांगू शकेल ह्याची खात्री नसते. ह्या बाबतीत बरेचवेळा 'अरे हे मी काय लिहून गेलो' अशी अवस्था (चांगल्या व वाईट दोन्ही दृष्टीने ) होऊ शकते.

ह्या सुप्त व जागृत अवस्थेतीत संयोगाचे काही क्षण हेच खरे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक असते असे माझे मत आहे. त्या अवस्थेत पुन्हा पुन्हा जाता येणे ही कविता करण्यामागची एकमेव ओढ असते / असावी.

No comments:

Post a Comment